औरंगाबाद- कामात हलगर्जीपणा केल्याने महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी काही अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई केली. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. अधिकार्यांवरील कारवाईचे स्वागत होत असले तरी मनपात फोफावलेल्या दलालांचे काय? मनपात बोकाळलेल्या दलालगिरीला आयुक्त कधी आळा घालणार, असा सवाल आता शहरवासियांकडून करण्यात येत आहे.
महानगरपालिकेला यंदा ४५० कोटी रुपये करवसुलीचे उद्दिष्ट आहे. मागील वर्षी करापोटी ८० कोटी रुपये वसूल झाले होते. यंदा विक्रमी करवसुली करण्याचा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांचा मानस आहे. यातूनच मनपा प्रशासन आणि पदाधिकार्यांनी मिळून वसुली आणि नियमितीकरण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आयुक्तांनी ९ पथके स्थापन करून वसुली मोहिमेला गती दिली आहे. दरम्यान, आयुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून याआधी मनपातील तीन बड्या अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. उपायुक्त रवींद्र निकम, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी.एस. नाईकवाडे आणि संजय जक्कल यांना आयुक्तांनी निलंबित केले. यानंतर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद यांना मालमत्ता करवसुलीत हलगर्जीपणा केल्याने निलंबित केले. असे एकानंतर एक कामचुकारपणा करणार्या अधिकार्यांवर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. अधिकार्यांनी मात्र याची धास्ती घेतलेली आहे.
आयुक्त डॉ. विनायक
यांनी स्वतः मनपातील बोकाळलेल्या दलालगिरीचा मुद्दा काही दिवसांपूर्वी उपस्थित
केला होता. यानंतर मनपात हा विषय चांगलाच गाजला. स्थायी समितीतदेखील महिला
नगरसेवकांनी हा मुद्दा चांगला लावून धरला होता. एवढे सगळे झाल्यावरही आयुक्तांनी
दलालांना आळा घालण्याकरिता पावले का उचलली नाहीत? आयुक्तांवर राजकीय दबाव आहे काय? असा प्रश्न
उपस्थित केला जात आहे. दलालगिरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुक्त डॉ. विनायक काय
पावले उचलतात, याकडे सर्वांचे
लक्ष लागले आहे.














